डोंबिवलीतील प्रदूषणाची दखल घेऊन यात तातडीने सुधारणा करण्याचे डॉ श्रीकांत शिंदे यांचे प्रदूषूणमंडळाला दिले आदेश
डोंबिवली दि. ५: डोंबिवली येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ परिसरातील फेज २ मध्ये रस्ते काल रासायनिक प्रदूषणामुळे गुलाबी झाले होते. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमआयडीसी,एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारल्याचे दिसून आले. डोंबिवली एमआयडीसीतील प्रदूषणाचा मुद्दा हा वेगवेगळ्या कारणांमुळे गाजत असतो. कधी हिरवा पाऊस, तर कधी उग्र दर्प. त्याप्रमाणेच सोमवारी डोंबिवली एमआयडीसीतील काही रस्ते रासायनिक प्रदूषणामुळे चक्क गुलाबी झालेले पाहायला मिळाले. तर काही जणांनी उग्र वासामुळे डोळे चुरचुरण्याचीही तक्रार केली. या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांनी आज एमआयडीसीतील संबंधित ठिकाणी आणि सीईटीपीला भेट देत या प्रदूषणाच्या समस्येबाबत एमआयडीसी आणि एमपीसीबी अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसीकडे बोट दाखवत आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला. तर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनीही थातूर मातूर उत्तरे देत यातून आपण नामानिराळे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
मात्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना प्रदूषणाची ही समस्या पूर्णपणे बंद होण्यासाठी आवश्यक उपाय योजना तातडीने अंमलात आणण्यास सांगितले. तर एमआयडीसीने एमआयडीसी भागातील अंतर्गत रासायनिक पाणी वाहून नेणारी जुनी यंत्रणा लवकरात लवकर नविन बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आणि एमपीसीबी अधिकाऱ्यांनी एमआयडीसीतील कंपन्यांना अचानक पाहणी दौरा करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचनाही खासदार डॉ. शिंदे यांनी संबधितांना यावेळी दिल्या. यानंतर मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या केंद्राला भेट देउन पहाणी केली व त्याची पध्दत जाणून घेउन "कामा" या उत्पादक कंपन्यांच्या संस्थेच्या सभासदांना आपली यंत्रणा सुधारून अधिक गतिमान करण्यासाठी कागी सुचना दिल्या.
दरम्यान येत्या काही दिवसात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई हे डोंबिवली एमआयडीसीमध्ये भेट देऊन पाहणी करणार असल्याचेही खासदार शिंदे यांनी सांगितले. या सूचनांचे पालन एमपीसीबी आणि एमआयडीसी कितपत करते किंवा नाही हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. सदर प्रसंगी क.डों.म.पा. महापौर विनिता राणे, तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे, उपतालुकाप्रमुख बंडू पाटील, युवासेना अधिकारी श्री. योगेश म्हात्रे, प्रादेशिक अधिकारी श्री. शंकर वाघमारे व एमआयडीसी तर्फे इंजिनीयर श्री. एस. एस. शुक्ला व संबधित खात्यातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.