महिलांवर पिलीसांचा लाठीमार.

 




महिलांवर पोलिसांचा लाठीमार 

........................................

पर्यायी रस्त्यासाठी आंदोलन केल्याने 

सिडको, पोलिस चवताळले 

........................................

पनवेल: पर्यायी रस्ता तयार केल्याशिवाय मुख्य रस्ता बंद करून देणार नाही, असा धोशा लावून सिडको उभारत असलेल्या विमानतळाच्या कामाला विरोध करणाऱ्या वाघिवळी येथील महिलांसह दहा गाव प्रकल्पग्रस्तांना पोलिस बळ वापरून फरफटत नेल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये पुन्हा एकदा असंतोष उफाळून आला आहे. दुपारी 2:30 वाजता एनआरआय पोलिस आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये हा वाद माजला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीत प्रकल्पग्रस्तांचा तळतळाट सिडकोला सतावत आहे. सिडकोने भूसंपादन आणि गावे स्थलांतर करताना केलेल्या वाटाघाटीप्रमाणे शब्द न पाळल्याने गेल्या महिनाभरापासून प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवनाच्या गेटसमोर काळीज टांगून आंदोलन छेडले आहे. मात्र, ब्रिटिश प्रवृत्तीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा आणि त्यांच्या ताटाखालची मांजरं असलेले विमानतळ प्रकल्प अधिकारी यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही.

राजकीय नेत्यांच्या तोंडात शेतकऱ्यांचे कैवारी, लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव आणि काखेत सिडको अधिकाऱ्यांना मदत करणारी यंत्रणा असल्याने विमानतळबाधित शेतकरी अक्षरशः रस्त्यावर आले आहेत.

शेतकऱ्यांना सिडको विश्वासात घेऊन पुनर्वसन करीत नाहीच शिवाय पोलिस बळाचा वापर करून प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा वारंवार प्रयत्न करीत असल्याने सिडकोविरोधात भविष्यात 'चले जाव आंदोलन' उभे राहिल्यास आश्चर्य वाटायला नको, इतकी भयानकता वाढली आहे.

आज, दुपारी वाघिवळी महिलांनी पर्यायी रस्त्यासाठी सिडको ठेकेदाराचे काम अडवल्याने ठेकेदार आणि सिडकोने एनआयआर पोलिसांना पाचारण केले. त्यांनी महिलांना सूचना दिल्या. मात्र आपल्या हक्कासाठी 'करो या मरो' च्या उद्देशाने आंदोलनात उतरलेल्ल्या महिलांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. काही महिलांना हाताला धरून फरफटत नेले. या धूमश्चक्रीत अनेक महिला जखमी झाल्या आहेत, अशी माहिती हाती आली आहे.

त्यानंतर आंदोलकांना बेलापूर येथील एनआयआर पोलिस ठाण्यात घेऊन गेले. या घटनेमुळे सिडकोविरोधात पुन्हा आक्रोश पेटला आहे.